१९७२ सालची गोष्ट आहे. गावासारखे असलेले गोरेगाव नगरासारखं सजू लागले होते. त्यावेळी नुकतीच गोरेगावात माणसांची वस्ती वाढत होती.नव्याने आकार घेणाऱ्या या उपनगराला स्वतःचा असा वेगळा चेहरा असावा अशा इच्छेने काही तरुण धडपडत होते.एखादी संस्था स्थापन करुन कामाला सुरुवात करण्यास ते तरुण सज्ज झाले.नेमक्या कोणत्या दिशेने काम करावे याबद्दल मार्गदर्शन मिळावं म्हणून गोरेगावकर तरुण शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांना भेटले.बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सांगितले की, संस्था स्थापन करुन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम करत राहू नका तर समाजात अनेक गोष्टी दुर्लक्षित राहिल्या आहेत, त्याकडे लक्ष द्या.असं काम करा की जे दुस-या कोणी केलं नसेल.ज्या कामाकडे कुणी पाहिलंही नसेल.आजच्या तरुणांमध्ये कोणतेही काम करण्याची क्षमता आहे.मात्र त्यांना विधायक कार्याकडे वऴवायला पाहिजे.तसं झालं तर ही तरुण पिढी वेगळा इतिहास घडवेल.
बाळासाहेबांचा प्रेरणादायी विचारांप्रमाणे तरुणांनी कामाला सुरुवात केली.१९७२ मध्ये १६ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यांनी संस्थेची स्थापना केली.
समाज घडविण्याचं व्रत घेतलेल्या तरुणांनी आपल्या संस्थेला ‘‘प्रबोधन गोरेगाव’’ असे नांव दिले.तसेच आपल्या कार्याचे क्षेत्र ठरविले – ज्ञान, कला आणि सेवा ! प्रबोधन गोरेगाव पहिला कार्यक्रम आखला तो ‘नाट्यमहोत्सवाचा’. या पहिल्या नाट्यमहोत्सावाच्या यशस्वी आयोजनानंतर प्रबोधनच्या कार्यकर्त्यांचा विश्वास बळावला. कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्याइतके बळ त्यांच्या अंगी आले आणि पहिल्याच वर्षापासून प्रबोधनने वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आखणीला प्रारंभ केला.
कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आणि त्यांच्या कलाप्रतिभेचा आविष्कार कलाप्रेमींपर्यंत पोहोचविण्याचा प्रबोधनचा हा कलाप्रवास गेली अनेक वर्षे अखंडीतपणे सुरु आहे. संथावलेल्या एकांकिका सादरीकरणाला वेग आणण्यासाठी प्रबोधनने एकांकिका स्पर्धाचेही आयोजित केल्या. रांगोळीची प्रदर्शने भरवून रांगोळीकरांना व्यासपीठ मिळवून दिले. २००१ साली सुरु झालेल्या मुंबई महोत्सवामुळे पश्चिम उपनगरातील रसिकांच्या मनात प्रबोधनची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे.
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.