कलाप्रातांतील दिग्गजही प्रबोधनच्या मंचावर आपली कला सादर करताना सुखावतात, तृप्त होतात तर प्रबोधनमुळे मिळालेल्या कलानंदामुळे उपस्थित रसिकवृंद कृतार्थ होऊन भरुन जातात.
माणसांच्या विचारांना – बुध्दिला चालना देणारे, कलागुणांना वाव देणारे, प्रकृती स्वास्थ्याचे रक्षण करणारे उपक्रम प्रबोधन अगदी सुरुवातीपासून राबवित आहेत. थोरामोठ्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळावी या आग्रहातून प्रबोधनने प्रबोधन व्याख्यानमाला सुरु केली. गोरेगावकरांची ज्ञानार्जनाची भुक भागविण्यासाठी २००० साली प्रबोधनने व्यासपीठ उपक्रम सुरु केला.
उमलत्या वयात मुलांवर चांगले संस्कार होणं जितकं गरजेचे असते, तितकेच योग्यवेळी त्यांना आत्मविकासाची संधी देणेही आवश्यक असते. ह्या उद्दिष्टाने सुरु करण्यात आलेल्या वर्क्तृव स्पर्धेने हजारो विद्यार्थांना देण्यात महत्त्वाचे योगदान हाती घेतले आहे. महाराष्ट्रात प्रबोधन वर्क्तृत्व स्पर्धेत प्रबोधनने आपले आगळे वेगळे स्थान प्राप्त केले.
शिक्षण क्षेत्रात, ज्ञानदानाच्या प्रांतातही प्रबोधन गोरेगाव महत्त्वाची भूमिका बजावित आहे. करियरचा पाया घडविणारे या एस. एस. सी परिक्षेसाठी नेमके मार्गदर्शन देण्यासाठी प्रबोधनने पहिल्या वर्षापासूनच एस. एस. सी. व्याख्यानमाला सुरु केली. झोपडपट्टीत राहणार-या या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत त्यांच्या शिक्षणाचा पाया बळकट व्हावा यासाठी संस्थेने जवाहरनगर, कोयना वसाहत येथील परिसरात ३२ वर्षापूर्वी सुरु केलेल्या बालवाड्या आजही विद्यार्थ्यांना उत्तम संस्कार देत आहेत.
प्रबोधनच्या कार्यसीमा, शिक्षण – कलेपुरत्याच मर्यादित नव्हत्या तर क्रीडाक्षेत्र ही संस्थेच्या उद्दिष्टांचा एक भाग होता. प्रबोधनने सुरुवातीच्या काळापासून कला आणि सेवा प्रमाणेच क्रीडा विकासाकडे देखील लक्ष द्यायला सुरुवात केली. २१ नोव्हेंबर १९९१ रोजी शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते क्रीडाभवनाचे उद्दघाटन करण्यात आले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खो–खो, कबड्डी, क्रिकेट, याशिवाय ऍथलेटीक, जिम्नॅस्टिक, मल्लखांब, भरतनाटयम्, योगाभ्यास याकडेही लक्ष द्यायला सुरुवात केली.अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी व्यायामशाळा, लॉन टेनिस अन्य इनडोअर गेम्सच्या सोयींनी हळूहळू क्रीडाभवन सुसज्ज होत गेले. ‘प्रोजेक्ट २०००’ सारख्या उपक्रमाद्वारे जागतिक दर्जाचे क्रीडापटू तयार करण्यासाठी प्रबोधनने महत्वाची पाऊले उचलली.२००४ साली प्रबोधनने गोरेगावकरांना पोहोण्यासाठी ‘ओझोन जलतरण तलाव’ आणि क्लबची सुविधा उपलब्ध करुन दिली.
बदलत्या काळानुसार जनसामान्यांसाठी नियमित व्यायामाची निकड ओळखून गोरेगावकरांना सकाळ संध्याकाळ चालण्यासाठी हक्काची जागा असावी याकरिता प्रबोधनने जॉगर्सपार्क विकसित केले. २१ मे १९९९ रोजी शिवसेनेचे कार्याध्यक्ष माननीय श्री. उध्दव ठाकरे यांच्या हस्ते नवीन उपक्रमांचे उद्घाटन झाले.
उपनगरातील जनतेसाठी त्वरीत रक्तपुरवठा होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने मीनाताई रक्तपेढीची मुहूर्तमेढ शिवसेनेचे कार्याध्यक्ष माननीय श्री. उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ७ नोव्हेंबर २००४ रोजी रोवली. अहोरात्र सेवा बजावणारी ही मुंबईतील एक ‘हायटेक ब्लडबॅक’ म्हणून ओळखली जाते. सदर रक्तपेढीचा उल्लेखनीय आगळा वेगळा उपक्रम म्हणजेच मुंबईतील सर्वप्रथम संपूर्ण वातानुकूलित
सर्व साधनसामग्रीचे सुसज्ज व प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी तसेच तंत्रज्ञानासह फिरते रक्तसंकलन वाहन ‘प्रबोधन रक्तवाहिनी’. २२ फेब्रुवारी २००९ रोजी ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री. मधु मंगेश कर्णीक यांच्या हस्ते प्रबोधन ठाकरे वाचनालयाच्या पुर्नविकास वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. उच्च शिक्षणार्थींसाठी सुसज्ज प्रबोधन अभ्यासिकेची सोय वाचनालयाच्या वास्तूत करण्यात आली. ’चांगल्या पुस्तकासारखा दुसरा उत्तम मित्र नाही’ या सुविचाराचा व्यक्तीच्या आयुष्यात उत्तम बदल पाहावयास मिळतात. ‘आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आजची युवा पिढी वाचनापासून दुरापास्त होत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन युवा पिढी, बालक त्याचबरोबर वाचनाची आवड असूनही ती जोपासता येत नाही अशा प्रौढ – ज्येष्ठ नागरीकांसाठी प्रबोधनकार ठाकरे वाचनालयात २५ हजार पुस्तकांचे सुसज्ज वाचनालय सुरु करण्यात आले.
बदलत्या काळानुसार वाढत्या महागाईमध्ये अनेक मध्यमवर्गीय नागरिकांना उत्तम प्रतीची जेनेरिक औषधी खरेदी करणे परवडत नसल्यामुळे त्यांना जीवघेण्या आजारांचा आणि रोगांचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणा-या नागरिकांना मदतीचा हात म्हणून ‘धर्मादाय औषधपेढी’ या उपक्रमाद्वारे प्रबोधन गोरेगावने ठरविले. त्यादृष्टीने संस्थेने जनसेवेचे व्रत म्हणून या नवीन उपक्रमाचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमूहुर्तावर शुक्रवार, २७ मार्च २००९ रोजी ‘धर्मादाय औषधपेढी’ चे उद्घाटन करण्यात आले. सदर औषधपेढी गोरेगावसह इतर उपनगरातील सर्वसामान्य गरीब रुग्णांकरीता नक्कीच उपयुक्त ठरेल. येथे औषधांसोबतच वॉटरबेड, वॉकर, व्हील चेअर ईत्यादी उपकरणे माफक दरात उपलब्ध केले जातात. रुग्णांना प्रबोधन डायलेसीस सेंटरची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. चार दिवस मौजेचे, क्रीडा महोत्सव, प्रबोधन टी २० क्रिकेट, खो – खो करंडक, प्रबोधन वैयक्तिक स्पर्धा यांचे आयोजन केले जाते.जाणता राजा, सावरकर उत्सव, समर्थ उत्सव, मुंबई फेस्टीवल, हर्बल वर्ल्ड, वृक्षदिंडी, सहस्त्रकांच स्वागत, उन्हाळी प्रशिक्षण शिबिर, राष्ट्रीय सणांचे आयोजन, गुजरात भुकंपग्रस्तांसाठी मदत, साथीच्या निराकरणासाठी लसीकरणाची मोहीम, रक्तदान शिबिरे, करियर मार्गदर्शन शिबिरे, अतिवृष्टिमुळे पीडित झालेल्यांना आवश्यक त्या जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा आदी विविध कार्यक्रमातून प्रबोधनने माणुसकी जपली आहे. या समाजकार्यातून प्रबोधनच्या समाजघटकांशी असलेली बांधिलकी अनुभवयास येते. १९७२ सालापासून सुरु झालेला ‘प्रबोधन गोरेगाव’ नामक सतत प्रवाहाचा अथक प्रवास, जो यापुढेदेखील जनसेवेच्या अंगिकारलेल्या मार्गावर अविश्रांत वाटचाल करीत राहणार आहे.
संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत अनेक मान्यवर व्यक्ती, संस्था, पत्रकार, क्रीडासमीक्षक त्याचप्रमाणे संस्थेच्या सभासदांचे व अनेक कार्यकर्त्यांचे सतत सक्रीय असे आर्थिक पाठबळ लाभल्यामुळे आज संस्थेने यशस्वीरित्या विविध उपक्रमांमध्ये वाटचाल केली. सेवाभावीवृत्तीने काम करणा-या सेवक वर्गाचेही संस्थेच्या वाटचालीत महत्वाचे सक्रीय योगदान लाभले आहे. त्याशिवाय सतत आर्थिक पाठबळ देणारे देणगीदार, दानशूर व्यक्ती, गोरेगावचे आमदार, नगरसेवक आणि महानगरपालिका प्रशासन या सर्वांची संस्था अत्यंत ऋणी आहे. या सर्वांसोबत ऋणानुबंध व प्रेम सतत वृद्धिंगतच होत राहील, याचा आम्हास मनापासून विश्वास वाटतो.
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.