Adiwasi Adhar Trust

      समाजातील सर्वाधिक उपेक्षित घटकांपैकी, विशेषत: दुर्गम भागातील आदिवासींना नेहमीच अन्न-वस्त्र-निवारा अशा मूलभूत सुविधांसह आजच्या जगात प्रगतीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या शिक्षणासारख्या सोयींपासून वंचित राहावे लागते आहे. त्यामुळे या घटकाच्या विकासासारखी घोर समस्या सरकारच नव्हे तर समाजातील अन्य घटकांना सातत्याने सतावत आली आहे. सरकारी स्तरावर होणारे प्रयत्न पुरेसे नसतात. तेव्हा स्वयंसेवी संस्थांनी आदिवासी बांधवांच्या समस्यांचे निरकरण करण्याच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने पाहणे हे ओघाने आले. याच जाणिवेतून श्री. लैला महाजन आणि डॉ. अलका मांडके यांनी डॉ. नीतू मांडके स्मृती आदिवासी आधार ट्रस्टची स्थापना करुन तिथल्या मुलांसाठी वसतिगृह बांधण्याचा संकल्प सोडला होता. त्यांच्या या उपक्रमाला शिवसेना नेते व आमदार सुभाष देसाई यांनी आर्थिक हातभार लावल्याने तो पुर्णत्वास गेला. वसतिगृहामधील विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण गरजांची पूर्तता करण्यासाठी वर्षाला साधारणपणे तीन लाख रुपये एवढ्या निधीची आवश्यकता होती. २४ डिसेंबर २००७ रोजी सुरु झालेल्या या वसतिगृहासाठी आवश्यक निधी जमा करणे विश्वस्तांना कठीण जाऊ लागले. या अडचणीच्या काळात श्री. सुभाष देसाई यांनी मार्गदर्शन व मदत केली, परंतु पैशांच्या समस्यांबरोबर श्रीमती महाजन यांचे वाढते वय आणि श्रीमती मांडके या आपल्या कामात व्यस्त असल्याने संस्थेला हा उपक्रम प्रभावीपणे राबविणे कठीण जाऊ लागले. हे कार्य श्री. सुभाष देसाई यांनी पुढे चालवावे अशी विनंती श्रीमती महाजन यांनी करुन त्यांनी संस्थेचे नेतृत्व स्वीकारावे असे आवाहन केले. श्री. देसाई यांनी ही जबाबदारी प्रबोधनने स्वीकारावी अशी संस्थेचे संस्थापक या नात्याने आपल्या सहकाऱ्यांना सूचना केली. या कार्याचे महत्व लक्षात घेऊन मार्च २०१० पासून डॉ. नीतू मांडके वसतिगृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी प्रबोधनने स्वीकारली. संस्थेच्या वतीने सर्वश्री गिरीश देसाई, अनिल देसाई, गोविंद गावडे, सुनील वेलणकर, शशांक कामत ही मंडळी वसतिगृहाचे व्यवस्थापन पाहत आहेत.
या वसतिगृहामध्ये सध्या २० विद्यार्थी असुन त्यांना सकस आहार दिला जातो. इमारतीची आवश्यक डागडुजी करुन तिची देखभाल व्यवस्थित होत असल्याने वसतिगृहाची स्थिती सुधारली आहे. तेथील मुलांसाठी नवि अंथरुन-पांघरुन देण्यापासुन ते स्वयंपाकघरासाठी आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करुन काही वर्षांत हे वसतीगृह आदर्श व्हावे यादृष्टीने प्रयत्न करण्याचा संकल्प प्रबोधनने सोडला आहे. वसतिगृहाचे दैनंदिन व्यवस्थापन पाहण्यासाठी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भविष्यामध्ये या वसतिगृहाचा विस्तारही करण्याची य़ोजना असून ५० विद्यार्थ्यांची सोय करण्याचे उदिष्ट नक्की करण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना गणवेश, नियमित वैद्यकीय तपासणी व उपचार, वाचनालय, क्रीडांगण व क्रीडा साहित्य उपलब्ध करुन देण्यासंदर्भात विचार चालू आहे. समाजातील दानशूर मंडळी, उद्योगसमूह यांच्याकडून अर्थसहाय्य मिळविण्यासाठी आपली संस्था प्रयत्न करत असून नेहमीप्रमाणे श्री. सुभाष देसाई यांचे त्यासाठी मार्गदर्शन लाभणार आहे. या उपक्रमासाठी प्रबोधनच्या सर्वच सदस्यांनी सढळ हाताने अर्थसहाय्य करावे ही विनंती.

 
© 2009 Prabodhan Goregaon. All Rights reserved. Best viewed in 1024 x 768 resolution Site designed & maintained by : Pristine Multimedia Pvt. Ltd.